नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अर्चना राहुले (वय 50 ) यांची हत्या त्यांच्या पतीनेच आपल्या भावाच्या मदतीने केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात रॉड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर लेआऊट येथे घटना घडली. डॉ अनिल राहुले (वय 52 वर्ष) यांनी भाऊ राजूसोबत (वय 59 वर्ष) मिळून कट रचून डॉ. अर्चना यांची हत्या केली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.अर्चना या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्यांचे पती अनिल हे छत्तीसगड येथील रायपूर येथे मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा मुलगा तेलंगणा येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे. डॉ. अनिल हे अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. यावरून दोघांमध्ये वाद विकोपाला गेला होता. यातूनच अनिलने भावाची मदत घेऊन अर्चनाच्या हत्येचा कट रचला.
अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय
मयत अर्चना यांचे पती अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. ते आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत असतात. परंतु, मागच्या काही काळापासून अर्चना यांचे बाहेरील व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल यांना होता. याच कारणातून ही हत्या केल्याचे आरोपी अनिल यांनी सांगितले.
रॉडने अर्चनाच्या डोक्यावर घाव घातला
दरम्यान, अनिल भावासह 9 एप्रिलला घरी आला होता. घरी आल्यानंतर त्यांनी रॉडने अर्चनाच्या डोक्यावर घाव घातला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घराला कुलुप लावून तेथून निघून गेले. त्यानंतर 13 तारखेला रात्री घरी परतले. घडलेल्या प्रकाराबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचा बनाव करत अर्चनाचा मृतदेह पाहून रडायला सुरुवात केली.
दरम्यान पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यांना पती अनिलवर संशय आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अनिलने भावाच्या मदतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.