महाड : मुंबई-गोवा महामार्गावर शहरानजीक सव येथील गरम पाण्याच्या झऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या महाबळेश्वर येथील तिघे पर्यटक महाडच्या सावित्री नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवार, १८ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच शोधपथक घटनास्थळी दाखल झाले व या तिघांचा शोध सुरू केला. अखेर सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिघांचेही मृतदेह चाहेर काढण्यात शोध पथकांना यश आले. दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुनव्वर शहाबुद्दीन नालबंद आणि या कुटुंबाचा मित्र जाहिद जाकीर पटेल अशी या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सव उन्हाळा हे महाड तालुक्यातील गरम पाण्याचे झरे असणारे एक छोटस पर्यटन स्थळ आहे. तसेच येथे शहा सैलानी दर्गाही आहे. रविवारी दुपारी महावळेश्वर येथील नालबंद कुटुंब सव येथील गरम पाण्याच्या झऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. या सर्वांनी गरम पाण्याच्या झऱ्यांचा आनंद घेत दर्ग्यामध्ये चादर चढवून पूजा करून बाजूलाच असणाऱ्या सव होडी बंदराच्या पायऱ्यांवर बसून थोडा काळ विसावा घेतला.
दरम्यान, त्यांच्यापैकी एकाचा पाय घसरून तो सावित्री नदीच्या किनाऱ्यावरून नदीपात्रात गेला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने त्याला हात दिला. मात्र, त्याचाही तोल जाऊन तोही नदीपात्रात वाहून जाऊ लागला. हे दृश्य पाहताच या दोघांच्या बचावासाठी तिसऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र, तोही नदीपात्रात कोसळला, ही घटना जेथे घडली ते ठिकाण खोल पाण्याचे असल्याने व दुर्दैवाने तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. तो ऐकून नदीकिनारी लोकांची गर्दी जमली. या घटनेची माहिती टीम सिस्केप, महाड आपदा मित्रमंडळ, साळुंखे रेस्क्यू टीम महाड, माणगाव आणि स्थानिक ग्रामस्थांच्या चार बोटी घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी या तिघांचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना या तिघांचे मृतदेह नदीपात्रातून काढण्यात यश आले. त्यानंतर या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह प्रशासन आणि पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.