महाड: महाड शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. सोमवार आणि मंगळवारच्या रात्री या चोरट्यांनी महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील सहा बंद फ्लॅट फोडले. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याने कुणीही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकारानंतर शहरात पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याची चर्चा जोरात रंगू लागली आहे.
सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने थेथील रहिवासी बहुतांशी नागरिक बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक इमारतींमधील फ्लॅट बंद आहेत. ही संधी साधून सोमवार आणि मंगळवारच्या रात्री प्रभात कॉलनीमधील प्रतीक गृहनिर्माण सोसायटीमधील चार आणि या सोसायटीलगतच असलेल्या श्री जी गृहनिर्माण सोसायटीतील दोन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. या सर्व घरांमधील कपाटे उचकटून त्यांनी रोख रक्कम व मौल्यवान दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे त्यांनी या साऱ्या घरांतील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित फ्लॅट मालकांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी फिर्याद देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी आम्ही आमच्या पद्धतीने तपास सुरू केला असल्याचे महाड पोलिसांनी सांगितले आहे