रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील नारंगी आणि जगबुडी नदीला मोठा पूर आल्याने शहरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. असं असताना खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक ३२ वर्षीय तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयेश रामचंद्र आंब्रे (वय-३२) असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मित्रांच्या डोळ्यांदेखत जयेश वाहत चालला होता. त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काही चाललं नाही. ही थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या बचावपथकाचे जवान जयेशचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून भयावह पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. खेड शिवतर मार्गावर शिवतर ते नामदेव वाडी यादरम्यान मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं असून रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या खेळविणेरे मार्गावर देखील मातीचा भराव आल्याने हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. सध्या सर्वच ठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य राबवत असून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचं धाडस करू नका, असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.