श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर मंदिर संस्थानने मंदिर परिसरात तोकडे व अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा सूचना फलक मंदिर परिसरात उभा करण्यात आला आहे.
श्रीवर्धन व हरिहरेश्वर समुद्रकिनारी देशभरातून पर्यटक येत असतात. हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारीच शंकराचे प्राचीन मंदिर आहे. समुद्रात स्नान केल्यानंतर पर्यटक येथील मंदिरात दर्शनासाठी येतात, त्यामुळे पर्यटकांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपत अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान न करता सात्विक गणवेश घालावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
काही वर्षांपूर्वी दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टने देखील सात्विक गणवेश सक्ती केली, त्याप्रमाणेच कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थानने अंगप्रदर्शन करणारी वस्त्रे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना देणारे फलक मंदिर परिसरात लावल्याची माहिती संस्थेचे सचिव, खजिनदार सिद्धेश पोवार यांनी दिली.