रत्नागिरी : रत्नागिरीमधून धक्कादायक बातमी समोर आली असून आंबा घाटातील सड्याचा कडा या ठिकाणी दोन अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही मृतदेह पुरुषाचे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 17 ऑगस्ट रोजी ही समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून लवकरच या दोघांच्याही मृत्यू मागील कारण नेमकं काय हे कळेल.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आंबा घाटातील सड्याचा कडा या ठिकाणी दाट झाडीमध्ये दोन अनोळखी मृतदेह आढळले. हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना समजताच देवरुख व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांना सह्याद्री चांदोली व्याघ्र प्रकल्प परिसरात एक दुचाकी आढळली आहे. या दुचाकीचा आणि दोन मृतदेहांचा काही संबंध आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
मृतदेह बाहेर काढताना अडचणींचा सामना..
मृतदेह खोल दरीत पडल्यामुळे पोलिसांना ते बाहेर काढण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी लागली. या मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांची उत्तरीय चाचणी केली जाईल. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण काय ते समजण्याची शक्यता आहे.