रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. केवळ रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही हे प्रकरण थांबले नसून, रुपाली चाकणकर यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) आता खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली असून, चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांची त्यांच्यासोबत असलेल्या ओळखीमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनी या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे ‘व्यावसायिक कनेक्शन’ उघड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची बांधकाम व्यवसायात भागीदारी आहे. ‘कर्मा कन्स्ट्रक्शन LLP’ च्या माध्यमातून त्यांनी रोठ खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी केली आहे. या बांधकामाविरोधात भाजपचे बबलू सय्यद यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली असून, हे बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा केला आहे. आकाश चौधरीच्या नावावर रिव्हर राफ्टिंगपासून ते रिसॉर्टपर्यंत अनेक मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहेत, जे आता तपासाच्या परिघात आले आहेत. चौधरी हे तटकरेंचे भागीदार असून तेच चाकणकरांचेही भागीदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.







