PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी कोकणात येणार असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर मोदी सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे’ पंतप्रधान साक्षीदार होतील. यानिमित्ताने 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गातील पर्यटन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आलाय.(Narendra Modi)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली केंद्रासमोरील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदल दिन साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच वरिष्ठ मंत्री, अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे या कार्यक्रमासाठी याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे सर्व दिग्गजांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र तयारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी सर्व पातळीवर सुधारणा करण्यात आल्या असून स्वच्छता, सुभोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतील.
असा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी अंदाजे दुपारी 3 वाजता गोव्यातील मोपा विमानतळावर उतरतील.
- त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
- त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. तिथे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार
- पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर याठिकाणी जनतेला संबोधित करतील
- प्रात्यक्षिक सुरू झाल्यानंतर पुन्हा गोवा विमानतळावरून दिल्लीकडे रवाना