Nasrapur : नसरापूर : निवी (ता. राजगड) येथील 20 वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन पांडुरंग कचरे असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कचरे हा आज सकाळपासून घरातून बेपत्ता होता. तो घरी परतला नसल्याने त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी त्याचा शोध सुरू केला होता. शोध घेत असताना त्याच्या घराजवळील विहिरीपाशी त्याच्या चपला आढळल्याने संशय अधिक बळावला.
त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनेची दखल घेत आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. सुमारे एक तास चाललेल्या शोधमोहीमनंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
यावेळी हवेली आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष तानाजी भोसले आणि त्यांच्या पथकाने तत्परतेने मदत करत मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेल्हे पोलीस पुढील तपास करत आहेत.







