सिंधुदुर्ग: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “कोण तरी भास्कर जाधव भाडोत्री आणला आहे माझ्यावर टीका करण्यासाठी, मी आता त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण, एक दिवस चोप मात्र नक्की देणार”, असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात राणे बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, या भास्कर जाधवला बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मी आमदारकीचे तिकीट दिले. तसेच निवडणुक लढवण्यासाठी 15 लाख रुपये दिले, त्याचा भास्कर जाधव यांना विसर पडला आहे. माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतात, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. माझ्याकडे आले आणि म्हणाले प्रचाराला पैसे नाहीत. मी विचारले किती लागतील? म्हणाले 10 लाख लागतील. एकदा दहा आणि एकदा 15 लाख घेऊन गेले. ते पैसे परत देण्याचीही त्यांची दानत नाही, असा दावाही मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पार पडलेल्या सभेत भास्कर जाधवांनी नारायण राणेंवर खरपूस टीका केली होती. भास्कर जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा मला दम देतो. तसेच भास्कर जाधव यांनी नारायण राणेंचे नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता.