महाड, (रायगड) : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी (ता. ०२) सकाळी झालेल्या स्फोटात ११ जन बेपत्ता झाले होते. यातील ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. शुक्रवारी रात्रभर शोधकार्य चालू होतं. उर्वरीत सात जणांचा शोध सुरु आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन देखील केले आहे.
गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या कंपनीत एकूण ५७ कामगार काम करत होते. त्यातील जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश आपण दिल्याचं यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. चौकशीनंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले आहेत.