मुरुड: तालुक्यातील राजपुरी बंदरात असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला व कोकण किनाऱ्यावरील सर्व वॉटर स्पोर्ट २६ मेपासून बंद करण्यात आले आहेत. पावसाळ्यात समुद्र रौद्ररूप धारण करत असल्याने किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा उसळतात. अशावेळी पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी जंजिरा किल्ला व सर्व वॉटर स्पोर्ट बंद करण्यात आले असल्याची माहिती पुरातत्त्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर नेण्यासाठी शिडाच्या बोटींचा वापर केला जातो. या शिडाच्या बोटी महाराष्ट्र मेरिटाइम बोडनि बंद केल्या आहेत. त्यामुळे आता ही बोट वाहतूकसुद्धा बंद राहणार असल्याचेही येलीकर यावेळी म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना बजरंग येलीकर यांनी, समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा जलदुर्ग २५ मेपासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो. तसेच पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच २६ मेपासून जंजिऱ्याचे दरवाजे बंद करावेत, अशा स्वरूपाचे आदेश मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्त्व खात्याला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी सुद्धा एक पत्र काढून समुद्रात चालणारी कोणतीही जलवाहतूक व पर्यटकांना लुभावण्यासाठी समुद्रात चालणारे वॉटर स्पोर्ट २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे एकंदर समुद्रातील सर्व वाहतूक बंद राहणार आहे. पर्यटकांना पुढचा आठवडाच जंजिरा किल्ला व जल वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर येथील सर्व वाहतूक बंद राहणार असल्याने जंजिरा किल्लासुद्धा बंद राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.