ठाणे: ठाण्यातील भिवंडी शहरातुन काळीज पिळवडून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका आईने पोटच्या 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना भिवंडी शहरातील फेणे गाव या ठिकाणी घडली आहे. भिवंडी शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती रात्रपाळी साठी कामावर गेलेला असताना फेणे गाव येथे ही घटना घडली. येथे लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमागावर काम करायचा त्याची पत्नी पुनिता (वय 32 वर्ष) व मुली नंदिनी (वय 12 वर्ष), नेहा (वय 7 वर्ष) व अनु (वय 4 वर्ष) असं त्याचं कुटुंब त्यांच्यासोबत तो राहत होता. घटना घडलेल्या दिवशी लालजी हे रात्रपाळीवर कामावर गेले होते. ते सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परतले तेंव्हा घरचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर लालजी यांनी बराच वेळ दरवाजा वाजवला तरी देखील दरवाजा कोणीही उघडला नाही. तेंव्हा लालजी याने छोट्या खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर आला.
सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत.
आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये अशा मजकुराची चिट्ठी घटनास्थळी मिळाली आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समोर आलेले नाही. याबाबत पोलिस तपास करत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा देव खराडे यांनी दिली आहे.