रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना २० नोव्हेंबर रोजी मतदान सुरू होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झालेली आहे. २६३ दापोली, २६४ गुहागर, २६५ चिपळूण, २६६ रत्नागिरी व २६७ राजापूर या विधानसभा मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार आहे.
सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात १०० मीटरच्या आतमध्ये असणाऱ्या आस्थापना चालू राहिल्यास, त्याठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते व इतर समाजकंटक विनाकारण जमा होऊन, विविध कारणांवरून त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्याअन्वये सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश जारी केले आहेत.