महाड: शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याच्या घटना कायम समोर येत असतात. अशातच शुक्रवारी त्यात आता महाडची भर पडली आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांच्याविरोधातील ठाकरे गटाचा मोर्चा हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यावरून दोन्ही बाजूंनी हमरीतुमरी होऊन बाचाबाची देखील झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आणखी चिघळली नाही. या घटनेनंतर आता ऐन थंडीत महाडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलंच गरम झालं आहे.
महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरून या दोन्ही गटात जोरदार जुंपली. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना केलेल्या वक्तव्यावरून हा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार गोगावले यांनी शिवसेना प्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे आता वर गेले आहेत. त्यांचे मत जाणून घ्यायचे असेल तर कोणाला तरी वर जावं लागेल’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाडमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगेलच आक्रमक झाले होते. आमदार गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यावेळी हा राडा झाला. तब्बल दीड तास हा राडा सुरू होता.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुकी करत होते. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.