नागोठणे: नागोठण्यात रविवारी रात्री तुरळक पाऊस पडला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची व वीटभट्टी व्यावसायिकांची दैना उडाली. गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे नागोठणे शहर व विभागातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. नागोठणे विभागातील वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे विटा बनवण्यासाठी लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भद्रीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त वीटभट्टींचे पंचनामे करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी विभागातील वीट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक मेटाकुटीला आल्याचे दिसून आले. वीटभट्टी व्यावसायिकांनी तयार करून ठेवलेल्या कच्च्या विटांवर पडलेल्या पावसाने विटांची पर्णतः माती झाली असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. काहींनी पाऊस पडायला सुरुवात होताच कच्च्या विटांवर तत्काळ ताडपत्री टाकण्यासाठी धडपड केली, मात्र ताडपत्री घेऊन वीटभट्टीवर पोहचेपर्यंत उशीर झाल्याने कच्च्या विटांचे पावसामुळे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे रॉयलटीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे वीट व्यावसायिक आज आर्थिक संकटात सापडले आहेत.