चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यापूर्वी भास्कर जाधव यांनी चिपळूण मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, अशी भावनिक साद भास्कर जाधव यांनी घातली होती.
मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील बोलण्यासाठी आपण येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर भास्कर जाधव हे आज रविवारी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांच्या डोळ्यात आश्रू आले. त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी विरोधकांना धडकी भरवणारे आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला आहे.
लेकाचं भाषण ऐकून भास्कर जाधवांना अश्रू अनावर
विक्रांत जाधव म्हणाले की, भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत. पाठ दाखवून पळणे आमच्या रक्तात नाही, असे विक्रांत जाधव यांनी म्हणताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात सुरू असणाऱ्या बातम्या निराधार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्य भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्यांच्या एखादा खालचा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. असं विक्रम जाधव म्हणाले.
आजकाल पैसे देऊन सभेला लोक आणले जात आहेत हे तुम्ही सर्व जण बघत आहात. मला आयुष्यात जर काही कमवायचे असेल तर माझ्या वडिलांनी जसे 40 वर्ष तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमवले ते मला कमवायचे आहे. मला दुसरं काहीही नको. प्रामाणिक लोकं पैसे देऊन आणली जात नाहीत. त्यासाठी प्रेम आणि आदर जपावा लागतो. तो 40 वर्ष भास्कर जाधव यांनी जपला आहे, तेच प्रेम भास्कर जाधव यांची लढण्याची ताकद आहे, असेही विक्रांत जाधव म्हणाले.