रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून एसीबीची झाडाझडती सुरू आहे. आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी स्वत: एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले आहेत.
साजन साळवी यांची प्रतिक्रीया
“मी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. ज्या दिवशी मला एसीबीकडून चौकशीसाठी पहिली नोटीस मिळाली त्यादिवशी मला समजले होते की, ही मंडळी माझ्या घरापर्यंत एक दिवस नक्कीच पोहचणार, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे.” अशी प्रतिक्रीया राजन साळवींनी एसीबी चौकशी विषयी बोलताना दिली. त्याशिवाय, मला अटक झाली तरी चालेल, अटक, जेल हे सर्व मला नवीन नाही. मी काय आहे, हे मला, माझ्या कुटुंबाला, जनतेला माहिती आहे, असंही ते म्हणाले आहेत.
कुटुंबीयांची एसीबीकडून चौकशी
राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर होत्या. तर, साळवी यांचे बंधू, पुतणे यांचीही चौकशीला झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित होते. मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
मालमत्तेचे मूल्यांकन केले
राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्यात घर, हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, इंटरियर डिझाईनिंगसाठी करण्यात आलेला खर्च यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.