Kolhapur News : कोल्हापूर : छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजणी केली असता, काही ऐतिहासिक महत्त्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या घटनेची तत्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले आणि भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन तीन आठवडे लोटले. (Kolhapur News) ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर ही बाब समोर आली.
८ ते १० अलंकार गहाळ
याबाबत कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती आपल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. (Kolhapur News) यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपूर्ण चौकशी करण्याची व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, दररोज वापरात असलेल्या १ ते ७ क्रमाकांच्या डब्यापैकी क्रमांक ६ च्या डब्यातील ८ ते १० अलंकार गहाळ असल्याचे उघड झाले आहे. हे दागिने कधी गहाळ झाले याबाबतचा अंदाज बांधता येत नाही, अशी माहिती मिळत आहे.