Khalapur News : खालापूर : गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे खालापूर येथील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडीत दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली शेकडो जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर गर्दी होते. राज्यभरात पावसाने कहर केल्यामुळे पर्यटनस्थळे देखील धोकादायक झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, खालापूर येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. जखमींची विचारपूस केली. (Khalapur News) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. विनाकारण घराबाहेर पडू नका. तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Khalapur News) दरम्यान, मुसळधार पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पावसाचा पॅटर्न बदलला
पूर्वी एका महिन्यात जेवढा पाऊस पडत असे, तेवढा पाऊस आता एक ते दोन दिवसांत पडत आहे. परिणामी अशा दुर्घटना घडत आहेत. सध्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे. यापुढे मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडू शकते, असे स्पॉट शोधून कार्यवाही करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. (Khalapur News) आज सकाळीच त्या रुग्णालयात गेल्या. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खोदकामादरम्यान २१ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू :