आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणप्रसारात संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या खांद्याला खांदा लावून समर्पित भावनेने सर्व आयुष्य वेचले. आज 4 सप्टेंबर 2025 रोजी जयंती प्रसंगी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा. बहुजनांच्या, दुर्बलांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी मातेच्या भूमिकेतून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले म्हणूनच त्या ‘आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणमाता आहेत.’
बेळगाव येथील सुप्रतिष्ठित अशा दत्ताजीराव नानासाहेब चव्हाण पाटील घराण्यात, शेती व्यवसायाने सदन असलेल्या, स्वाभिमानी वृत्तीने जगणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी सुशीलादेवी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1927 रोजी झाला. जन्मतःच काही दिवसांनी आईचे छत्र हरवले. आजी कृष्णाबाई या आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या या आजीने त्यांना लहानाचे मोठे केले. अध्यात्माचे बाळकडू आजीनेच त्यांना दिले. संत तुकारामांच्या ओव्या, पौराणिक कथा आजीकडूनच त्यांनी ऐकल्या होत्या. आजी बरोबर नेहमी मंदिरात जाणे, शंकराची उपासना करणे हे नित्याचे होते. त्यांचे वडील सुशीलादेवींना आपल्या स्वतःच्या शेतामध्ये घेऊन जात असे. टोमॅटो, बिट, बटाटा, मुळा यांची शेती कशी करायची, त्याचबरोबर फुलांचा मळा कसा सांभाळायचा, त्यांची देखभाल कशी करायची त्यांनी वडिलांकडून शिकले होते.

सुशीलादेवी यांना एक भाऊ विठ्ठलराव तर चार बहिणी चंद्रभागा, नर्मदा, इंदू आणि लीला होत्या आणि सर्वात शेवटचे शेंडी फळ म्हणजे सुशीलादेवी. म्हणूनच सर्वांकडूनच त्यांचे लाड व्हायचे. त्यांचे शिक्षण बेळगाव येथील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. तो काळ ब्रिटिश राजवटीचा असल्याने ब्रिटिश मिशनरी शाळा चालवायचे. त्यामुळे शाळेत अंगभर घोळदार अंगारखे चढवून येणाऱ्या सिस्टरना बघून सुशीलादेवींना कुतूहल वाटायचे. त्यांना ने- आण करणाऱ्या बग्गीचे तेवढेच नवल वाटायचे. शाळेमध्ये पाठ करून घेतलेल्या कविता, पावकी दिडकीचे पाढे त्यांना शेवटपर्यंत पाठ होते. सुशीलादेवी इतर भावंडात खूप हुशार होत्या परंतु इयत्ता सातवी नंतर त्यांचे शिक्षण थांबले आणि घर कामात त्या दंग झाल्या. पुढे गोविंदराव अर्थात बापूजी साळुंखे यांच्याशी 15 डिसेंबर 1940 रोजी बेळगाव येथील हनुमानाच्या डोंगरावर त्यांचा विवाह झाला.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची ‘शिक्षणमहर्षी’ डॉ. बापूजी साळुंखे यांच्यासारख्या झंझावाताबरोबर संसार करणे ही कठिण बाब होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत झोपडीत राहून संसार त्यांनी केला. त्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमीगतांना भोजनाची व्यवस्था करीत असत. देशाच्या स्वातंत्र लढयात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना भेटण्यासाठी संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ता घरी गेल्यास त्यांना आवर्जून भोजनदान करण्यास त्या तत्पर असत. संस्थेच्या वसतिगृहातील अनाथ मुलांची आई होऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्यांना घास भरवून त्यांनी सांभाळले. त्यामुळेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था एक सुसंस्काराची संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
आज संस्थेच्या 403 शाखा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. लौकिक अर्थाने संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झाले होते. परंतु डॉ. बापूजी साळुंखे यांनी त्यांना वाचनाची सवय लावली. डॉ. बापूजींच्या साहित्याच्या पहिल्या वाचक त्या होत्या. डॉ. बापूजी साळुंखे शैक्षणिक कामासाठी बरेच दिवस बाहेरगावी असायचे. तेव्हा संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे बापूजी यांना पत्र लिहायच्या. पत्र लिहिताना पत्राची सुरुवात “जय हिंद” या शब्दांनी त्या करायच्या कधी प्रिय पती तर कधी प्रिय बापूजी लिहायच्या. पत्र लिहिताना त्यांची चाललेली कुटुंबाची आर्थिक परवड पत्रातून सांगताना, त्यांनी बापूजींना जेवणाची गैरसोय करून घेऊ नका व कामाचा बराच त्रास होत असेल तर त्याचाही त्रास करून घेऊ नका. असा नेहमी त्या सल्ला देऊन बापूजींच्या पाठीमागे त्या खंबीरपणाने उभ्या असायच्या.
संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे या धार्मिक वृत्तीच्या होत्या. एकदा त्या मुंबई, अहमदाबाद, सोरटी सोमनाथ, उज्जैन येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी गेल्या असता, प्रत्येक ठिकाण पाहून झाल्यानंतर त्या बापूजींना संध्याकाळी पत्र लिहून पाठवीत असे, तेथील स्थळाचे वर्णन करताना त्या म्हणतात, द्वारकेला गेल्यावर समुद्रातील बोटीतून आम्ही प्रवास केला. ती सोन्याची द्वारका पाहिली. हरीकुंडात आंघोळ केली. 56 कोटी देव आहेत असे ऐकले होते. परंतु इकडे तर थोडेच देव आहेत. परंतु इकडे मोर मात्र भरपूर आहेत. सोरटी सोमनाथ येथे पार्वती-शंकर आहेत. येथे कौल लावला तर प्रकृती चांगली होते असे म्हणतात. सोमनाथाला चांदीचे व बेलाचे पान वाहिले. इकडे पाऊस नाही. परंतु हवा फार चांगली आहे. इकडे ऑइलचे, मिठाचे, कपड्याचे कारखाने भरपूर आहेत. असा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाचा त्या उल्लेख करताना दिसतात.
या पत्रातील मजकुरातून एक गोष्ट विशेष लक्षात येण्यासारखी आहे, ती म्हणजे त्या धार्मिक प्रवृत्तीच्या असल्या तरी त्यांना पशुपक्षी व निसर्गाबद्दलही आपुलकी आहे असे दिसून येते. अहमदाबादला गेल्यानंतर डॉ. बापूजी साळुंखे यांना सुशीलादेवी साळुंखे पत्रातून कळवतात इकडे प्राणी संग्रहालय पाहिला, गीता मंदिर पाहिले, सावर नदी पाहिली, गांधीजींचा आश्रम पाहिला, वल्लभभाई पटेल गव्हर्नर बंगला पाहिला, राम मंदिर, स्वामी जगन्नाथ मंदिर इत्यादी प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे पाहिली. खूप आनंद वाटला. परंतु तुम्ही तुमच्या प्रकृतीला जपा. अशा प्रकारे संस्थामाता कुठेही असल्या तरी डॉ.बापूजींची नेहमी त्या काळजी करत असायच्या. सर्व दैवतापेक्षा बापूजी हेच प्रथम त्यांचे दैवत होते याची त्यांना नेहमी जाणीव होती.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू पहायला मिळतात. परिस्थितीवर मात करून संकटाशी झुंज देऊन अडीअडचणींना सामोरे जाऊन कणखर खंबीर झालेली संस्थामाता सुशिलादेवी, आत्मविश्वास असलेली बापूजींच्या सानिध्यात राहून प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणारी सुशिलादेवी, स्वतःच्या मुलाप्रमाणे वसतीगृहातील मुलांचा सांभाळ करून अनाथांची माय असणारी सुशीलादेवी, स्वतःचा संसार सांभाळून दुसऱ्यांचे संसार फुलवत राहणारी सुशिलादेवी, सर्वांवर समान प्रेम करणारी प्रेमळ सुशीलादेवी, आयुष्यभर दातृत्वाचा निर्मळ झरा बनलेली सुशीलादेवी, आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्माची कास धरलेली सुशीलादेवी, आपल्याला झेपेल अशा पद्धतीने समाजाचे ऋण फेडणारी, आणि ज्ञान दानासारखे पवित्र दान दुसरे कोणतेच नाही हे जाणणारी सुशीलादेवी, डॉ.बापूजींच्या हाकेला साथ देणारी सुशीलादेवी, गुरुदेव कार्यकर्त्यावर असलेले प्रेम, निष्ठा, आदर, तितकाच जिव्हाळा, अध्यात्माचे भंडार, मातृत्व, दातृत्वाचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान अशा साऱ्यांचा अजातशत्रु म्हणजे सुशिलादेवी साळुंखे. त्यांनी सारा देह सामाजिक आणि शैक्षणिक कामासाठी चंदनाप्रमाणे झिजविला.
आयुष्याची संध्याकाळ कधी झाले ते कळलेच नाही. एक फुंकर मारावी आणि आयुष्याची पाने भरभर पलटावी. त्याप्रमाणे त्यांचे आयुष्य निघून गेले. बापूजीचे निर्वाण झाल्यानंतर संस्थामातेच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. अखेरचे दिवस आता कठीण जात होते. संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळत होती. मिळालेल्या पुंजीतून त्यांनी अनेक सत्कार्य केले. अंध शाळेत शिकणाऱ्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तक, वह्या वाटप केले. तसेच अपंग विद्यार्थ्यांना धान्य, साखर, तेल इत्यादी वस्तु रूपाने मदत केली. वृद्धाश्रमातील लोकांना ऊबदार कपडे, चादरी आवश्यक्य वस्तूंची देणगी रूपाने भेट दिली. गरीब लोकांना अन्नदान केले. अशा या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे निर्वाण 22 ऑक्टोबर 2013 या दिवशी कोल्हापूर या ठिकाणी झाले. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठायी असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. असे आमच्या संस्थेच्या आई संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांना त्यांच्या 98व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
-प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर पुणे.







