अमित मुंडीक
पिंपरी-चिंचवड: शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत एकूण 50 अवैध पिस्टल, 79 जिवंत काडतुसे आणि 116 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच, 40 गुन्हे दाखल करून 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखांच्या संयुक्त कारवाईत या शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
जप्त केलेली अवैध शस्त्रास्त्रे:
पिस्टल – 50
जिवंत काडतुसे – 79
जप्त केलेली धारदार शस्त्रे:
कोयते – 91
तलवारी – 12
पालघन – 04
चाकू/गुप्ती/सुरा – 06
असे एकूण 116 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत.
या मोहिमेदरम्यान सोशल मीडियावर घातक शस्त्रांसोबत फोटो, व्हिडीओ, रील्स शेअर करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. सोशल मीडियाद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त चौबे यांनी सांगितले की, “शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. ही मोहीम पुढेही सातत्याने राबवण्यात येणार असून अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.”
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून अशा मोहिमा भविष्यातही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत.







