सोलापूर : शहरात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज (3 सप्टेंबर) पहाटे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एक तरुण अश्लील कृत्य करत होता. हे पाहताच स्थानिक नागरिक आणि गस्त घालणारे पोलिसांनी त्या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केला. त्यानंतर काही तरुणांनी वर जाऊन त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत तो तरुण गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सोलापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस दल सतर्क झाले आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नसून तो मानसिक रुग्ण असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मृत तरुणाविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धक्काबुक्की करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले की, “3 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक तरुण अश्लील कृत्य करताना आढळला. त्यावेळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तयार झाला नाही. त्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीत तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.”
आयुक्तांनी पुढे सांगितले की, “ज्या व्यक्तींनी त्या तरुणाला मारहाण केली, त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोन गुन्हे नोंदवले आहेत. मृत तरुणाने अश्लील कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एक गुन्हा आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” या घटनेमुळे सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.







