कल्याण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जयदीप आपटेला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. या प्रकरणी महत्त्वाची बाब म्हणजे, जयदीप आपटे यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
जयदीप आपटेला अटक करण्यासाठी 5 ते 7 पथकं नेमण्यात आली होती. त्यातील कल्याण मधील पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीमने रात्री जयदीप आपटेला घरातून ताब्यात घेतलं. सिंधुदुर्गचे पोलीस जयदीप आपटेच्या मागावरच होते. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी आरोपी जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला दोन आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अखेर जयदीप आपटे पोलीसांच्या जाळ्यात नेमका कसा अडकला ?
आरोपी जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात येऊन पोहोचला होता. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. त्याच्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी तो निघाला होता. परंतु, इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणालाही इमारतीमध्ये सोडत नव्हते. दरम्यान, जयदीप आपटे हा इमारतीजवळ आल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला. त्यावेळी जयदीप आपटे घाबरलेल्या अवस्थेत पोलीसांसमोर रडायला लागला. पोलिसांनी त्याची समजूत काढत इमारती खालून त्याला अखेर ताब्यात घेतले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता. दरम्यान, जयदीप आपटे यांची पत्नी आणि कुटुंबीय त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी समजावत होते. पोलीसांच्या माहितीनुसार, जयदीप आपटे याने त्याच्या पत्नीशी संपर्क साधून घरी परत येण्याची माहिती दिली होती. त्यानंतर पत्नीने ही माहिती पोलीसांनी कळवली, ज्यामुळे पोलीसांनी आपटेस अटक केली आहे.
कोण आहे जयदीप आपटे?
जयदीप आपटे हा मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीचा प्रोपरायटर आहे. तो कल्याणमध्ये राहतो. कल्याणमधील त्याच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्यांच्या प्रभावामुळे आठवीत शिकत असतानाच जयदीपने कला क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करतात. जयदीप आपटेचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला.