पुणे : जर तुमचं इंजिनिअरींग झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या (Government Jobs) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापकांची 903 रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कुठे किती जागा भरल्या जाणार आहेत? तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? याबाबत आजच्या या बातमीद्वारे सर्वकाही जाणून घेणार आहोत.

किती जागांसाठी भरती

राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण 1 हजार 160 पदे रिक्त जागा भरल्या जाणार असून, त्यापैकी 903 पदे ही सरळसेवा या पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

कुठे किती जागा भरल्या जाणार
पुण्यात 83 पदे, कोकण (मुंबई) 259, नाशिक 124, छत्रपती संभाजीनगर 210, अमरावती 117, नागपूर 110 अशी भरती केली जाणार आहे.
किती तारखेपर्यंत अर्ज करता येणार?
उमेदवारांना 1 ते 24 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
कशी होणार भरती
या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार असून, येत्या 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.
कुठे अर्ज करायचा
इच्छुक उमेदवार https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्रधारक (आयटीआय सर्व्हेअर) या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी राज्य शासनाकडून जाहीर केली जाईल. त्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाचे संचालक डाॅ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.







