वर्धा : तळेगाव येथे असलेल्या एका क्रिकेट अकादमीच्या प्रशासकीय इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे बचावकार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या आगीत इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रिकेट अकादमीच्या इमारतीला भीषण आग लागल्याच्या घटनेची माहिती समजताच तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसोबत पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात एक पेट्रोल पंपही आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अकादमीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्काळ प्रतिसादामुळे आग आटोक्यात आणण्याचे काम वेगाने सुरू आहे.आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून यासंदर्भात तपास सुरू आहे.