मुंबई : विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना पायउतार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपाने जोर लावला आहे. ठाकरे गटातील एक एक मोहरे गळाला लावण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक संजना घाडी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.आज मुंबईत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय घाडी आणि संजना घाडी पक्ष प्रवेश करणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या व माजी नगरसेवक संजना घाडी व त्यांचे पती संजय घाडी हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाच्या बोरिवली-मागाठणे परिसरातील चेहरे होते. आता या घाडी दाम्पत्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहे. सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते. दोघेही पती पत्नी हे मुंबई महापालिकेत नगरसेवक राहीले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते, माजी नगरसेवक राहिले होते. त्यात घाडी दाम्पत्याचा समावेश होता. शिंदे गटाविरोधात या दोघांनी आक्रमक भूमिका मांडत विविध मुद्यांवर आंदोलन केले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाला घाडी दाम्पत्याने जय महाराष्ट्र करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.या पती-पत्नींनी शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन सोडत थेट एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
बोरिवली-मागाठणे या उत्तर मुंबईतील भागात भाजप आणि शिंदे गटाचे चांगले वर्चस्व आहे. अशातच आता संजय घाडी आणि संजना घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटासमोर या भागात मोठे आव्हान निर्माण होणार आहे.