मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची डिजिटल सेवा सुरु करण्यात आली आहे. आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या नवीन सुविधेमुळे आता कागदी बाँडची गरज संपणार असून, सीमाशुल्काची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक बॉण्ड फायदे :-
एकच बाँड, अनेक व्यवहार : प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग आणि बॉन्डेड वेअरहाऊसेसमधील उत्पादन यांसारख्या विविध व्यवहारांसाठी आता वेगवेगळ्या कागदी बाँडची गरज राहणार नाही. एकाच ई-बाँडद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करता येईल.

वेळेची बचत : कागदपत्रे कमी झाल्याने वेळ आणि पैसा वाचेल.
ई-स्टॅम्पिंग आणि ई-स्वाक्षरी : ई-बाँडची निर्मिती ICEGATE पोर्टलवर होईल. NeSL च्या माध्यमातून त्यावर ई-स्टॅम्पिंग (E-Stamping) आणि ई-स्वाक्षरी (E-Sign) केली जाईल.
सुरक्षित आणि पारदर्शक : ही प्रणाली पूर्णपणे ई-स्वाक्षरीवर आधारित असेल. आयातदार, निर्यातदार आणि कस्टम अधिकारी या तिघांच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीमुळे व्यवहार सुरक्षित, पारदर्शक होतील आणि फसवणुकीस आळा बसेल.
ऑनलाईन मुद्रांक शुल्क : राज्य शासनाने 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) ऑनलाईन भरण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे कागदी स्टॅम्प खरेदी करण्याची आवश्यकता नसेल.
दरम्यान, या प्रणालीमुळे कस्टम अधिकारी रिअल-टाईम पडताळणी करून त्वरित मंजुरी देऊ शकतील. तसेच, जुन्या बाँडमध्ये बदल करणे किंवा रक्कमवाढही डिजिटल पद्धतीने करणे सहज शक्य होणार आहे.
या निर्णयामुळे कागदपत्रांची आवश्यकता पूर्णपणे दूर होऊन पर्यावरण पूरक दृष्टीने ‘ग्रीन गव्हर्नन्स’कडे हे महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.







