जळगाव: रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गणवेशात जळगाव रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्या एका तोतया महिला पोलिसाला आरपीएफच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या उद्देशाने लोकांना प्रभावित करण्यासाठी तिने हा बनाव केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावर 15 ऑगस्ट रोजी आरपीएफकडून तपासणी सुरू असताना एक तरुणी संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आली. तिने आरपीएफची वर्दी परिधान केली होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. त्यावेळी आपण नाशिक येथे आरपीएफमध्ये कार्यरत असल्याचे तिने सांगितले.

मात्र, तिच्याकडे आरपीएफचे ओळखपत्र नव्हते. त्यामुळे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी नाशिक येथील आरपीएफशी संपर्क साधून तिच्या नियुक्तीबाबत माहिती घेतली. चौकशीत ती आरपीएफमध्ये कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले.

लग्नाच्या उद्देशाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून लोकांना प्रभावित करण्यासाठी तिने आरपीएफची वर्दी परिधान केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यापूर्वीही तिने महाराष्ट्र पोलिसांची वर्दी परिधान करून फोटो काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संबंधित तरुणीकडे काही बनावट कागदपत्रेही आढळून आली आहेत. पोलीस असल्याचे भासवून तिने कोणाची फसवणूक केली आहे का, तसेच स्वातंत्र्यदिनी बनावट वर्दी परिधान करून रेल्वे स्थानकावर फिरण्यामागे आणखी काही उद्देश होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
याबाबत आरपीएफचे पोलीस निरीक्षक ए. के. यादव यांनी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.
जळगावमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 7 लाख 60 हजारांची फसवणूक
जळगावमध्ये रशियन कंपनीचे शेअर्स विकून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाची 7 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विनोद सोनार आणि आनंद परदेशी यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी बनावट कंपनी तसेच फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून वकिलाशी संपर्क साधला. त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर संबंधित रक्कम परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







