लोणी काळभोर, ता. 29 : अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी मंदिरात भाविकांनी अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. 29) मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.

भाद्रपद महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा योग आहे. अंगारकी चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. ओमकार आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त उपस्थित होते. सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रांत अधिकारी यशवंत माने यांच्या हस्ते गणेशा संपन्न झाला व दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ.प. गोकुळ महाराज, जालना यांचे सुभाष्य कीर्तन झाले.

दरम्यान, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.






