पुणे, ता. 20 : ओडिशातून गांजा आणून पुणे शहरात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीविरोधात पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपी दिपक आबाजी तुपे (वय 39, रा. राजस सोसायटी, विद्यानगर, कात्रज, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ अन्वये तुपे हा पाहिजे आरोपी होता. अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेने त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ओडिशातून गांजा आणण्याच्या तयारीत असताना साथीदारांना अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दिपक तुपे हा ओडिशा राज्यात गांजा आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याचे साथीदार १७ ऑगस्ट २०२६ रोजी व्यापारी प्रमाणातील गांजासह पोलिसांच्या ताब्यात सापडल्याने तुपे महाराष्ट्रात परतला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तुपेविरुद्ध यापूर्वी आंध्र प्रदेश राज्यात व्यापारी प्रमाणातील अंमली पदार्थांशी संबंधित एनडीपीएस कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल असून, त्या प्रकरणांत त्याला अटक झालेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यातील अंमली पदार्थांच्या नेटवर्कची पाळेमुळे खणणार
या कारवाईमुळे परराज्यातून पुणे शहरात गांजाची तस्करी आणि विक्री करणाऱ्या संघटित टोळीविरोधातील तपासाला वेग आला आहे. या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून ठोस आणि प्रभावी कारवाई सुरू आहे. तुपे हा चंदननगर आणि वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनडीपीएस गुन्ह्यांमध्येही पाहिजे आरोपी आहे. त्याला संबंधित दोन्ही गुन्ह्यांत वर्ग करून पुढील अटकेची कार्यवाही करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण तसेच पोलीस हवालदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे, शरद धांडे, सुमित यादव, प्रशांत कळसकर, संदीप देवकाते, विनोद निंभोरे, अमोल जगताप, सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले, आरती दिवेकर, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, अमोल मुंढे आणि देवीदास वांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.







