पुणे: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुरू असतानाच मध्यवर्ती शनिवार पेठेत घरफोडीची धक्कादायक घटना घडली. हसबनीस बखळ परिसरातील एका सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिक शुक्रवारी (२५ सप्टेंबर) गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी कुटुंबीयांसह नातेवाईकांकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सुमारे ३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

शनिवारी पहाटे कुटुंबीय घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घराची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मध्यवर्ती पुण्यात नागरिकांची मोठी गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केले. या घटनेमुळे शनिवार पेठ परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.







