पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत ४४ लाख २७ हजार रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या बॅगेतून १ किलो २६५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई १९ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, संबंधित प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-241 या विमानाने बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता. विमानतळावर प्रवाशांचे प्रोफाइलिंग आणि चेक-इन बॅगांची एक्स-रे तपासणी सुरू असताना सीमाशुल्क अधिकाऱ्यांना त्याच्या सामानाबाबत संशय आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी बॅगेची सखोल तपासणी केली. या तपासणीत अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली युक्ती उघड झाली.

प्रवाशाच्या काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेच्या बाजूच्या अस्तरात विशेष गुप्त कप्पे तयार करण्यात आले होते. या कप्प्यांमध्ये हवाबंद आणि बहुस्तरीय प्लास्टिकच्या दोन पाकिटांत संशयित अमली पदार्थ लपवण्यात आला होता. पाकिटांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचा वाळलेला वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. प्राथमिक चाचणीत हा पदार्थ गांजा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने संपूर्ण साठा जप्त केला.

या प्रकरणी अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायदा, १९८५ अर्थात एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रवाशाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. परदेशातून पुण्यात अमली पदार्थ आणण्यामागे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास अधिकारी करत आहेत.
जप्त केलेला गांजा कोणाकडून आणण्यात आला होता आणि तो पुण्यात कोणाला वितरित केला जाणार होता, याचाही शोध घेतला जात आहे. पुणे सीमाशुल्क विभागाचे आयुक्त डी. अनिल आणि उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.






