अहिल्यानगर : जामखेड येथील कला केंद्रातील अंतर्गत वादातून एका गर्भवती महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंकी हनुमंत काटकर असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपींनी तिचे अपहरण करून बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे एका घरात मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला चारचाकी वाहनातून धुळ्याच्या दिशेने नेण्यात आले. धुळ्यातील एका निर्जन ठिकाणी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सरफराज उर्फ शफिक मोमीन (वय 35, व्यवसाय चालक, कळंब, धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या शेख (वय 31, व्यवसाय चालक, कळंब, धाराशिव), स्वाती उर्फ आरती कुऱ्हाडे (वय 28, व्यवसाय कलाकार, सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्र, जामखेड) आणि लक्ष्मी पवार (वय 30, कळंब, धाराशिव) यांचा ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

तर फारुख शेख (कळंब, धाराशिव) आणि रोहिणी जाधव (छत्रपती संभाजीनगर) हे दोघे फरार असल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींपैकी तीन जण धाराशिव जिल्ह्यातील असून, हत्याकांडातील चौघे आरोपी धाराशिवचे असल्याचेही समोर आले आहे.

पिंकी काटकर ही मूळची तरुणी असून जामखेड येथील कला केंद्रात काम करत असल्याची माहिती आहे. कला केंद्रातील अंतर्गत वादातूनच तिची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. आरोपींनी तिला मांजरसुंबा येथील एका घरात मारहाण केल्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिला चारचाकी वाहनातून राजस्थानच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संशयास्पद चारचाकी वाहनाच्या हालचालींचा माग काढताना धुळे पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तब्बल 11 तास तपासणी केली. या तपासातून पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले. चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या घटनेबाबत कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






