Cow’s Milk And Dung : सोलापूर : व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसे नाही तर तुमच्याकडे एक चांगली कल्पना असणं गरजेचं असतं. या शेतकऱ्यानं तेच सत्यात आणून दाखवलं. जे शेण लोक कचऱ्यात फेकून देतात, त्याच शेणापासून त्यानं कोट्यवधींचा उद्योग उभा केलाय. (Cow’s Milk And Dung)
गायीचे दूध आणि शेणाच्या विक्रीतून या शेतकऱ्याने तब्बल एक कोटीचा बंगला बांधलाय. हा शेतकरी कोणी परदेशातला नाही; तर आपल्याच महाराष्ट्राच्या मातीतील सोलापूर जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याने ही असामान्य किमया साधली आहे. (Cow’s Milk And Dung)
मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही, असे उपरोधिक टोले मारले जातात. पण मराठी माणसानं मनात आणलं तर तो काहीही करू शकतो…हे प्रकाश इमडे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. इमडे यांच्याकडे सुरवातीला वडिलोपार्जित चार एकर जमीन होती. पाण्याअभावी त्यांना या जमिनीत शेती करता आली नाही. या कारणास्तव त्यांनी गायींचे संगोपन करण्यास सुरूवात केली.
इमडे यांनी १९८८ मध्ये दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे एकच गाय होती. आज इमडे यांच्या फार्मवर सुमारे १५० गायी असून, एक हजार लिटर दूध असते. इमडे त्यांच्या शेतात जन्मलेले वासरू किंवा म्हातारी झालेली गाय विकत नाहीत. संपूर्ण कुटुंब मिळून गायीची सेवा करतात. संपूर्ण कुटुंब गाईचे दूध काढणे, गोठ्याची साफसफाई करणे, त्यांना खाऊ घालणे इत्यादी कामात मदत करते. (Cow’s Milk And Dung)
एक हुशार उद्योजक हा नेहमी आपल्या व्यवसाय कसा वाढवायचा याचा विचार करतो. प्रकाश इमडे यांनी देखील तेच केलं. त्यांनी दूधासोबतच गायीचं शेण विकण्याचाही व्यवसाय सुरू केला. इमडे यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. आता त्यांनी एक कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. त्यांनी त्यांच्या बंगल्याचे नावही ‘गोधन निवास’ ठेवले आहे.
शेतीमध्ये आता रासायनिक खतांऐवजी लोक सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. शिवाय गोबर गॅस प्लांट सुद्धा आहेतच. या नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासते. अन् ही गरज इमडे पूर्ण करतात. त्यांच्याकडे दिडशे पेक्षा जास्त गायी आहेत. वृद्ध गायींचा देखील ते मरेपर्यंत सांभाळ करतात. म्हणजे दूध संपलं की त्यांना सोडून देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून सुद्दा भरपूर शेण मिळतं. हे शेण विकून त्यांनी आणखी एका नव्या व्यवसायाची निर्मिती केली. (Cow’s Milk And Dung)
स्थानिक रहिवासी इमडे यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणतात. बापू दिवसाच्या सुरुवातीलाच गाय व देवी लक्ष्मीची पूजा करतात. गायीचा फोटो त्यांच्या देवघरात आहे. एका गायीपासून त्यांनी आज कोटींचा व्यवसाय उभारला आहे. जिच्यामुळं इतकं वैभव मिळालं आहे. त्या आईचा फोटो त्यांनी देवघरात ठेवला आहे. घरावर गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा उभारला आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे हे घर लक्ष वेधून घेते. पूजागृहात त्यांची पहिली गाय ‘लक्ष्मी’चे फोटोही ठेवले आहेत. २००६ मध्ये लक्ष्मीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या वंशजांनाही शेतात ठेवले. (Cow’s Milk And Dung)
दरम्यान, १५० गायींसाठी दररोज ४-५ टन चारा लागतो. शेतात शक्य तेवढा चारा पिकवला जातो आणि बाकीची खरेदी केली जाते. प्रकाश इमडे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतातील गाय पूर्वीपेक्षा जास्त दूध देते. पूर्वी २५ लिटर दूध देणारी गाय आता ४० लिटरपर्यंत दूध देते. एवढ्या गायी असूनही शेतात साप, विंचू दिसत नाहीत. इमडे यांनी शेतात तीन बदके आणली, त्यामुळे साप-विंचू येत नाहीत.
इमडे हे ‘एंटप्रेन्योर जीनियस’ असून आता ते तरुणांना रोजगारही देतात. आजूबाजूच्या गावातील आणि इतर राज्यातील लोकही त्यांची शेती पाहायला येतात. एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू जमिन होती. आज त्याच जमिनीवर त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा केलाय. गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज देशभरातील अनेक तरुण त्यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी इमडेवाडी गावात येतात. प्रकाश इमडे स्वत: या तरुणांची भेट घेऊन त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित करतात.