मुंबई : कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शांती हिंदी विद्यालयात शाळेवर ताबा मिळवण्यासाठी दोन संस्थेमधील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या मैदानात झालेल्या या तुफान हाणामारीत दांडक्याने व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली आहे . या घटनेचा पोलीस जखमी व्यक्तीला उचलून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कल्याण परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाचे संस्थेचे स्वयंसेवक व केअरटेकर म्हणून काम करत असलेले विवेक श्रीकांत पांडे काम करत होते. या वेळी शाळेचे आधीच्या संस्थेत असलेले विनोद पांडे, गगन जैस्वार, नीतू पांडे, श्वेता पांडे, सुष्मा पांडे आपल्या साथीदारासह शाळेच्या मैदानात आल्यावर त्यांनी विवेक पांडे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या तोंडावर काळे लावून एका खोलीत डांबून ठेवले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने सात हजार रुपये काढून घेतले.या जीवघेणा हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे.याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा तिवारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेच्या मैदानात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे व दगडफेक असा प्रकार घडल्याने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही संस्थेच्या 15 ते 20 जणांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न यासह जबरी चोरीच्या अनेक कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.