Michaung cyclone Weather : हमून चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरावर आणखी एक चक्रीवादळाचं मोठं संकट आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील चोवीस तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात हवामानात गारठा जाणवणार आहे. तसेच कोकण किनारपट्टी भागात हवामान कोरडं पाहायला मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासांत खोल दाबात रुपांतरीत होणार असून आज 3 डिसेंबरला चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 12 तासांत चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभावही कायम राहणार आहे, त्यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येईल. मिचॉन्गचा धोका दक्षिण आंध्रप्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
२ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात तीन दिवस ढगांची गर्दी, अन् पाऊस
बंगालच्या उपसागरात रविवारपासून तयार होणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात हलका पाऊस ढगांची गर्दी अन् दाट धुके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात मिचांग नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याने पुण्यातही रविवारपासून ते मंगळवारपर्यंत बाष्पयुक्त ढगांची गर्दी, हलका पाऊस अन् धुक्याची चादर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दृष्यमानता कमी राहणार आहे.