नवी दिल्ली : सध्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बहुतांश प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यातच या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेने बदलून देण्यासंबंधी ३० सप्टेंबपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आज संपत असतानाच आता रिझर्व्ह बँकेने या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, आता या नोटा ७ ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तात्काळ प्रभावाने चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. मात्र, मे २०२३ मध्ये आरबीआयने या नोटा बंद करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबर, २०२३ ची मुदत देण्यात आली होती.
रिझर्व्ह बँक ही मुदत वाढवू शकते, असे सांगितले जात होते. अखेर आरबीआयने या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. याचा भारतीय रहिवाशांसह अनिवासी भारतीयांना फायदा होणार आहे. कारण, अनिवासी भारतीय अर्थात एनआरआयकडून नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अखेर याला मुदतवाढ मिळाली आहे.
एक आठवड्याचा अतिरिक्त कालावधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची विद्यमान प्रणाली कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकच आज बँकेकडून जारी करण्यात आले.