पुणे: यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर अपेक्षेपेक्षा खूप कमी राहिले आहे. राज्याच्या एकूण 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पावसाचा जोर पाहता राज्यात जुलै महिन्यात अनेक भागांत चिंतेचे वातावरण दिसून आले होते. यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले असून, याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. मराठवाड्यापाठोपाठ कोकणातही पावसाचा जोर कमी राहिल्याने आल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत.

विभागनिहाय पावसाची स्थिती
- मराठवाडा: या विभागात पावसाची सर्वाधिक 24 टक्के तूट नोंदवली गेली आहे. सरासरी 326.5 मि.मी.च्या तुलनेत येथे केवळ 247.6 मि.मी. पाऊस झाला आहे.
- कोकण: कोकणातही यंदा 5 टक्के कमी पाऊस झाला आहे. येथे सरासरी 1890 मि.मी.च्या तुलनेत 1801.6 मि.मी. पाऊस पडला.
- मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ: या दोन विभागांनी मात्र सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 3 टक्के जास्त (429.2 मि.मी.) तर विदर्भात 1 टक्का जास्त (532.9 मि.मी.) पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट
गेल्या वर्षीची परिस्थिती याच्या अगदी उलट होती. त्यावेळी सर्वच विभागांमध्ये सरासरीपेक्षा 14 टक्के जास्त पाऊस झाला होता. पण, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे केवळ 130 तालुक्यांनीच सरासरी गाठली आहे. त्यामुळे, जुलै महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत एकूण 4 टक्के कमी पाऊस झाला आहे.







