लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी शहराचा नावलौकिक वाढावा व स्थानिक भूमिपूत्रांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलची समारोपाची संध्याकाळ पर्यटक व नागरिकांच्या उत्साहामुळे बहरली.
समारंभाला आलेल्या गीता कपूर, गायिका राधा मंगेशकर, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी फेस्टिवलला रंगत आणली. १ ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या तीन दिवसीय फेस्टिव्हला शहर व परिसरातील नागरिकांबरोबरच हजारो पर्यटकांनी हजेरी लावली होती.
पाचगणी कल्ब येथील आर्ट गॅलरी व जुन्या मोटारसायकली पाहण्यासाठी विविध शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पर्यटक व नागरिकांनी गर्दी केली होती. टेबल लॅंन्ड पठारावर दोन दिवस चाललेल्या पतंग महोत्सवात हवेत झेप घेत जेट्स, फायटर्स अशा छोट्या इंजिनवर उडणारी व बॅटरीवर उडणारी विमाने ही सर्व रिमोटद्वारे नियंत्रित करताना पर्यटकांना एक न्यारा आनंद मिळत होता. मुख्य बाजारपेठेत आयोजित केलेल्या खाऊ गल्लीत खाद्य प्रेमींनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत वॉकिंग प्लाझाबरोबर लाईव्ह बँडचा आनंद घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंचावर सदाबहार गाण्यांची मैफल रंगली होती. कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सायंकाळी कै. भाउसाहेब भिलारे स्टेडियमवर राधा मंगेशकर व पाचगणी फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सादर केलेल्या जुन्या-नवीन बहारदार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
शेवटच्या दिवशी रस्सीखेचच्या चुरशीच्या सामन्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला. मोठ्या जल्लोषात सुरू झालेल्या ‘आय लव्ह पाचगणी’या फेस्टीवलची हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.