मुंबई –भारतीय वंशाचा ड्रायव्हर अजय ओगुला हा सध्या दुबईतील एका ज्वेलरी फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याला फक्त आपलं नशीब आजमावायचे होते. बक्षीस जिंकेल याची त्याला अजिबात खात्री नव्हती.
मात्र, लॉटरी लागल्यानंतर त्याचा विश्वास बसेना. त्याच्या ‘इजी 6’ ग्रँड प्राईजमध्ये ३३ कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्तची लॉटरी लागली. अजयने सांगितले की, त्याला वाटले त्याने कमी रक्कम जिंकली असेल; पण जेव्हा त्याने मेसेज वाचला तेव्हा एवढी मोठी रक्कम जिंकली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
दुबईत राहणारा 31 वर्षीय अजय रातोरात करोडपती झाला आहे. त्याने एमिरेटस् ड्रॉमध्ये ३३ कोटी रुपयांचे भारतीय चलनात बक्षीस जिंकले आहे.
एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर अजय ओगुला म्हणाला की, मी लॉटरी जिंकली आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्यांनी सांगितले की या रकमेतून तो चॅरिटी ट्रस्ट स्थापन करणार आहे.
जेणेकरून त्याचे मूळ गाव आणि शेजारच्या गावांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करता येईल. अजय ओगुला हा मूळचा दक्षिण भारतातील एका खेड्यातील असून चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आला होता.
अजयने सांगितले की, जेव्हा त्याने भारतातील आपल्या कुटुंबाला आपण करोडपती झाल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या आई आणि भावंडांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही; पण मीडियात ही बातमी आल्यानंतर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांच्याआनंदाला पारावार उरला नाही. त्याने पहिल्यांदाच लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते त्यामुळे तो प्रचंड आनंदी आहे.