सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील होम मैदान या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव येथून आलेला दीड टन वजनाचा रेडा कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. गजेंद्र रेड्यासाठी दिवसाकाठी दोन हजार रुपयांचा खर्च आहे.
दिवसभरात २ किलो सफरचंद, १५ लिटर दूध, तीन किलो पेंड असे खाद्य लागते. त्याला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ५० हजार रुपये मानधन दिले आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनात या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने गुरुवारी (ता. २९) कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुर्मिळ पशू-पक्षी, परदेशी भाजीपाला व तांदूळ महोत्सवासह सव्वा कोटीचा रेडा व सव्वा लाखाचा बोकड या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ४ वाजता पार पडले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान व कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे कृषी प्रदर्शन हे आकर्षक व नावीन्यपूर्ण बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, रेशीम, खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीयकृत बॅंका, नाबार्ड, कृषी महाविद्यालये, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवउद्योजक व साखर कारखाने यांचा सहभाग आहे. तब्बल ३०० पेक्षा अधिक स्टॉल आहेत. प्रदर्शनात दुग्धोत्पादन, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन याबद्दल शास्त्रीय माहिती देण्यात येत आहे.
शुक्रवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबा लागवड डॉ. महेश कुलकर्णी, दुपारी १.१५ वाजता व्हर्टिकल फार्मिंग – डॉ. साईनाथ हाडोळे. शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ड्रोनचा वापर या विषयावर डॉ. गोरंटीवार, दुपारी १ वाजता आधुनिक कृषी अवजारे यांवर प्रा. टी. बी. बास्टेवाड यांचे व्याख्यान तर रविवार १ जानेवारी सकाळी ११ वाजता एकरी १०० टन ऊस उत्पादन सुरेश माने-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
दरम्यान, होम मैदानावर केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार यशवंतगौडा पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थित ५२ व्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ४ वाजता पार पडले.