World Police Wrestling विणीपेग, ( कॅनडा) ता. ३० : जागतिक पोलीस दलातील ऑलिम्पिक दर्जाच्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये महाराष्ट्राचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय नथ्थू चौधरी यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. (World Police Wrestling)
विजय चौधरी यांनी कॅनडा पोलीस दलातील गतविजेत्या जेसी साहोटाला दाखविले अस्मान
वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. या वर्षी या स्पर्धेचे कॅनडात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उपांत्य सामना ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी व कॅनडा पोलीस दलातील गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. या अटीतटीच्या सामन्यात विजय चौधरी यांनी जेसी साहोटाला ११-०८ च्या फरकाने पराभव केला. (World Police Wrestling)
त्यानंतर विजय चौधरी यांचा अंतिम सामना अमेरिकेच्या जे. हेलिंगर यांच्याशी झाला. या सामन्यात विजय चौधरी यांनी जे. हेलिंगरला अस्मान दाखवून ११-०१ या मोठ्या फरकाने बाजी मारून १२५ किलोग्राम वजनाच्या गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. आणि भारताचे नाव वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्सच्या चषकावर कोरले. (World Police Wrestling)
विजय चौधरी यांचे मुळगाव सायगाव बगळी (ता.चाळीसगाव, जि जळगाव) आहे. ते पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय चौधरी तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.
दरम्यान, विजय चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते. महाराष्ट्र राज्यातील एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचे नवीन ‘रेस्लींग सेंसेशन’ बनले आहेत.
विजयानंतर बोलताना विजय चौधरी म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे.”
“मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला व अंमलदारांना समर्पित करतो जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची २४ तास सेवा करीत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करतो.” असे चौधरी यांनी विजयानंतर सांगितले आहे.