अॅडलेड: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आयसीसीने त्याच्यावर दोषात्मक कारवाई करत मानधनातून २० टक्के रक्कम कापली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज ट्रेव्हिस हेड कारवाईतून सुटला आहे. दोघेही १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळू शकतात.
अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हेड आणि सिराज यांच्यात शाब्दिक वाद पाहण्यास मिळाला होता. १४० धावा केल्यानंतर सिराजने आपल्या गोलंदाजीवर त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला होता. पॅव्हेलियनमध्ये परतण्याच्या मार्गावर असताना प्रत्युत्तर म्हणून सिराजला उद्देशून हेड काही तरी म्हणाला होता, दोघांमधील संवाद स्पष्ट कळू शकला नाही. हेडने त्यानंतर आपण सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक केल्याचे सांगितले होते, मात्र सिराजने हेडचा दावा खोडून काढत त्याच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला होता. उलट हेडने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे सिराजचे म्हणणे आहे.
सामनाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार आयसीसीने सिराजला आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या कलमानुसार खेळाडू किंवा प्रशिक्षक फळीतील सदस्यांविरुद्ध अपशब्द वापरल्यास कारवाई केली जाते. आयसीसीने या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी १ डिमेरिट गुण दिले आहे. गेल्या २४ महिन्यांतील दोघांचा हा पहिला गुन्हा आहे. यामुळे कोणावरही बंदी घालण्यात आली नाही.