मुंबई: विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहलीने माघार घेतल्याची माहिती दिली. बीसीसीआयने विराट कोहलीच्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये भारतीय फलंदाजाचे माघार घेण्याचे कारण समोर आले आहे. त्यांच्या बदलीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
विराटने त्याला पहिल्या 2 सामन्यांसाठी मुक्त करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार बीसीसीआयने विराटची ही विनंती मान्य केली आहे. विराटने आतापर्यंत देशाचं प्रतिनिधित्वाला प्राधान्य दिलं आहे. मात्र आता त्याला वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. विराटने कोणत्या कारणासाठी विश्रांती घेतली यांचा माध्यमांनी आणि चाहत्यांनी अंदाज बांधू नये. विराटच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर करा, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
लवकरच बदली खेळाडूची घोषणा
बीसीसीआय लवकरच कोहलीच्या बदलीची घोषणा करेल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये विराट कोहलीच्या नावाचाही समावेश होता, परंतु आता या स्टार भारतीय फलंदाजाने आपले नाव मागे घेतले आहे, ज्यामुळे त्याच्या जागी लवकरच जाहीर केले जाईल.