मुंबई : भारताने घरच्या मैदानावरच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वाईट प्रदर्शन केले आहे. तीन कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमल्यानंतर सुरुवातीची उत्सुकता आता ओसरू लागली आहे. आता गौतम गंभीर यांच्या संघर्षात भर पडली आहे. भारतीय संघाला पुन्हा विजयी मार्गावर आणण्याचा त्यांच्यावर दबाव वाढला आहे.
टी-20 मध्ये यशस्वी पण कसोटी..
गौतम गंभीर प्रशिक्षकी म्हणून नेमला गेला तेव्हा त्याची अपेक्षा होती की, तो संघाला सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये वर्चस्व मिळवून देणार. टी-20 मालिकेत गंभीरने चांगली कामगिरी केली होती, परंतु वनडे आणि कसोटीत संघाच्या कामगिरीत मात्र मोठी पिछहाट बघायला मिळाली. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली, ज्यामुळे सूर्यकुमार यादव यावर संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
श्रीलंका विरुद्ध टी-20 मालिकेत यश..
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत भारताने श्रीलंकेवर वर्चस्व मिळवले आणि संपूर्ण मालिका खिशात टाकली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवायही संघाने प्रभावी कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. भारतीय फलंदाजांना स्पिनला तोंड देणे कठीण झाले, ज्यामुळे श्रीलंकेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून मालिका जिंकली.
बांगलादेशविरुद्ध कसोटीत मोठा विजय..
बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली. कानपूरमधील दुसऱ्या कसोटीत खराब हवामानामुळे पहिले दोन दिवस वाया गेले, परंतु भारताने विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंनी आपली चमक दाखवली. भारतीय संघाने तिन्ही सामन्यात विजय मिळवला आणि शेवटच्या सामन्यात 297 धावांचा विक्रमही रचला.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत मोठे अपयश..
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गंभीरला मोठा धक्का बसला आहे. भारताला आपल्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या फिरकीपटूंसमोर तग धरता आले नाही. ज्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या नावे घरच्या मैदानावरील मालिका पराभवाची नोंद झाली.