पुणे : झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज दीपक चहर यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तारांकित फलंदाज केएल राहुल मात्र या मालिकेलाही मुकणार आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात अनुक्रमे १८, २० आणि २२ ऑगस्टला तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. या मालिकेसाठीही भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून शिखर धवन या संघाचे नेतृत्व करेल. महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्यासाठी शनिवारी संघाची घोषणा केली. सर्वात मोठी बातमी म्हणजे ऑफस्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि मध्यमगती गोलंदाज दीपक चहर यांचे दीर्घ दुखापतीनंतर अखेर संघात पुनरागमन झाले आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार राहुल दुखापतीमुळे आयपीएलपासून एकही सामना खेळू शकलेला नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो टी-20 मालिकेत भाग घेणार होता, पण कोरोना संसर्गामुळे तो यातूनही बाहेर पडला होता. आता त्याला आणखी काही विश्रांती देण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी घेतला आहे.
संघ :
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.