मुंबई : पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना अनिर्णित राहिल्याने भारताने ही टी २० मालिका १-० ने खिशात घातली. या लढतीत भारताच्या मोहम्मद सिराजला सामनावीर तर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज नेपियर येथे पाऊस नसेल असा अंदाज वर्तविला जात असताना लढत सुरु होण्याची आधीच पावसाने आपली हजेरी लावली. त्यामुळे नाणेफेकीस देखील उशीला लागला. थोड्या व्यत्ययानंतर लढतीला पुन्हा सुरुवात झाली.
या लढतीत न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत १६० धावा केल्या. यात डेव्हन कॉन्वेने ५९ (५ चौकार, २ षटकार) तर ग्लेन फिलिपने ५४ (५ चौकार, ३ षटकार) धावांची खेळी करताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. बाकी फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावून परतत होते.
भारताकडून मोहम्मद सिराज व अर्शदिप सिंग यांनी भन्नाट गोलंदाजी करताना प्रत्येकी ४ गडी बाद केले. हर्षल पटेलने एक गडी बाद केला. मोहम्मद सिराजने ४ षटकांत केवळ १७ धावत चार बळी मिळविले.
भारताने आजच्या लढतीत अडखळत सुरुवात केली. सलामीवीर ईशान किशन केवळ १३ धावा फलकावर असताना बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत होते. ईशान किशनने १०, रिषभ पंतने ११, सूर्यकुमार यादवने १३ धावा केल्या.
श्रेयस अय्यरला भोपळा देखील फोडता आला नाही. ही पडझड होत असताना, कर्णधार हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करताना १८ चेंडूत ३ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ३० धावांची नाबाद खेळी केली. पावसाने लढत थांबली तेव्हा पांड्या ३० तर दीपक हुडा ९ धावांवर खेळत होते. न्यूझीलंड संघाकडून कर्णधार टीम साऊथीने २, ईश सोधी व ऍडम मिलरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
पावसामुळे लढत थांबविण्यात आली तेव्हा भारताचा डाव केवळ ९ षटकांचा झाला होता. यावेळी भारताची धावसंख्या ९ षटकांत ४ बाद ७५ होती. डकवर्थ लुईस नियमानुसार दोन्ही संघाच्या धावा या घडीला सामान होत्या. आणि पाऊस देखील सातत्याने सुरू असल्याने पंचानी सामना अनिर्णित असल्याचे जाहीर केले.
यामुळेच भारताने कर्णधार हार्दिक पंड्यांच्या नेतृत्वाखाली ही मालिका १-० अशी खिशात टाकली. मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्काराने तर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.