पुणे : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करत आशिया चषक आपल्या नावावर केला आहे. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीला पाचारण केले. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. मात्र त्यानंतर वानुंदू हसरंगा आणि भानुका राजापक्षेने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला १५० धावांच्या पार पोहचवले. हसरंगाने २१ चेंडूत आक्रमक ३६ धावा केल्या. तर भानुका राजापक्षेने ४५ चेंडूत नाबाद ७१ धावांची झुंजार अर्धशतकी खेळी कले. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले.
श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (४९ चेंडूंत ५५) आणि इफ्तिकार अहमद (३१ चेंडूंत ३२) यांनी संयमाने फलंदाजी केली. मात्र, मोक्याच्या क्षणी ते बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मदूशानने ३४ धावांत चार, तर हसरंगाने २७ धावांत तीन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ६ बाद १७० (भानुका राजपक्षे नाबाद ७१, वानिंदू हसरंगा ३६; हॅरिस रौफ ३/२९) विजयी वि. पाकिस्तान : २० षटकांत सर्वबाद १४७ (मोहम्मद रिझवान ५५, इफ्तिकार अहमद ३२; प्रमोद मदूशान ४/३४, वानिंदू हसरंगा ३/२७)