Sports News : हर्मोसिलो : भारताचा कंपाऊंड तिरंदाज प्रथमेश जावकरला विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या मॅथियास फुलटनकडून शूट-ऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शांघाय विश्वचषक विजेता जावकरने चार महिन्यांत दुसऱ्यांदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि गतविजेत्या माईक श्लोसरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तो विजेतेपदाच्या लढतीत फुलरटनकडून 148-148 (10-10*) पराभूत झाला.
भारताचा कंपाऊंड तिरंदाज प्रथमेश जावकर अंतिम फेरीत
केंद्राच्या जवळ जास्त शॉट्स मारल्यामुळे फुलरटनला विजेता घोषित करण्यात आले. तिसऱ्या फेरीनंतर जावकर 89-90 ने पिछाडीवर होता. पण चौथ्या फेरीत त्याने 30 पैकी 30 गुण मिळवले आणि गुणसंख्या 119 अशी बरोबरी केली. यानंतर, पाचव्या आणि अंतिम फेरीत दोन्ही तिरंदाजांनी समान 29 गुण मिळवले. टायब्रेकरमध्येही दोघांचे गुण सारखेच राहिले. मात्र, थोड्याफार फरकाने भारतीय खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
महिला तिरंदाज अपयशी
भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या आदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम या दोघीही पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. ज्योतीला कोलंबियाच्या सारा लोपेझने पाच गुणांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. गतविजेत्या अदिती स्वामीला दबावाचा सामना करता आला नाही आणि शूट-ऑफमध्ये डेन्मार्कच्या तंजा गेलेन्थियनकडून 9-10 असा पराभव पत्करावा लागला.